विद्यापीठात जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन मधून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पुतळाही उभारण्यात येणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. जी-२० संमेलनाच्या रूपाने तरूणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाला शिखरावर पोहचविण्याचे काम तरूणच करू शकतात, अशी आशाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित ‘जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, आ. मंगेश चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी. कार्तिगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे , नितीन झाल्टे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तरूणांनी प्रगती करण्यासाठी शिस्त अंगिकारण्याची गरज आहे. आजचा तरूण सोशल मिडियात अडकला आहे. भारतातील तरूणाची आता जगाला कौशल्यरूपी मनुष्यबळाच्या रूपाने गरज आहे. आज तरूणांमध्ये प्रतिभा आहे. तरूणांना दिलेले उद्दिष्ट तरूण निश्चित पूर्ण करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षणाकरिता आज भरपूर निधी दिला जात आहे. तरूण देशाचे भवितव्य आहे. तरूणांनी संधीचे सोने करावे. असे ही पाटील यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री .महाजन म्हणाले की, भारत तरूणांचा देश आहे. जगाला कौशल्ययुक्त तरुणांची गरज आहे. ही गरज भारताचे तरूण पूर्ण करू शकतात. यासाठी तरूणांनी कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. गाव सोडण्याचे धाडस केले पाहिजे. तरूणांनी कामात प्रामाणिकपणा अंगिकारला पाहिजे. मनामध्ये जिद्द ठेवून काम केले पाहिजे. संकटाला न घाबरता धाडस करून तरूणांनी काम केले पाहिजे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे, अशी अपेक्षाही महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.
कुलगुरू माहेश्वरी यांनी अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले, युवकांमधील उर्जेचा वापर करण्याचे आपल्यापुढे आवाहन आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे करत आहे. तासिका नियमित करा, कॉपी न करता परीक्षा द्या. जीवनात शिस्तपणा असला पाहिजे. चांगल्या मित्रांचा गोतावळा तयार करा, प्रमाणिकपणा जपा, ज्ञान, कौशल्य व प्रतिभेचा वापर करून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम तरूणांनी करावे. अशा शब्दात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राजेश पांडे यांनी बीज भाषण केले. २०४७ पर्यंत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश भारत असणार आहे. भारताची युवाशक्ती आपल्या कौशल्यावर जगाचं नेतृत्व करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात युवकांचे कौशल्य व कल्पनाशक्तीला वाव देणारा अभ्यासक्रम असणार आहे, असे पांडे म्हणाले. संमेलनाच्या उद्घाटनपूर्वी विद्यापीठ आवारात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांनीही युवकांशी संवाद साधला.