पाचोरा तालुक्यात गुन्हा दाखल, संशयित जळगाव शहरातील
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन तरुणीला जळगाव शहरातील तरुणाने पळवून नेत तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केला. तसेच, दारूच्या नशेत तिला मारहाण देखील केली. यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणाला शनिवारी २२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुण्यातूनच तरुणीसह पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
गोपाळ रामचंद्र माली (वय २८, रा. शांतिनारायण नगर, रामेश्वर कॉलनी परिसर, जळगाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याने पाचोरा तालुक्यातील १७ वर्षे ७ महिन्याच्या तरुणीला एका गावातून पळवून नेले. २९ जून ते २० जुलै पावेतो संशयित गोपाळ माळी याने त्या तरुणीवर तिच्या घरी आणि पुण्यातील वाघोली येथे जबरी लैंगिक अत्याचार केले आहे. तसेच दारू पिऊन देखील तिला मारहाण केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
त्यानुसार पिंपळगाव पोलीस स्टेशनला तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गोपाळ माळी याला शनिवारी २२ जुलै रोजी दुपारी पुणे येथून अटक करण्यात आली आहे. त्याला जळगाव जिल्हा न्यायालयात न्या. शरद पवार यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारतर्फे ऍड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.