चाळीसगाव (प्रतिनिधी) – वृद्धाने बँकेतून पैसे काढून ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्याचवेळी दुचाकीचे एक चाक पंचर निघाले.पंचरच्या दुकानावर दुचाकी लावून वृद्ध जवळच्या चहाच्या दुकानावर चहा पिण्यास गेला.चहा पिऊन आला तर दुचाकीच्या डिक्कीतील ८० हजार रूपयांची रोकड गायब झालेली होती.चाळीसगाव शहरात हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.याप्रकरणी अज्ञात भामट्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निवृत्त शिक्षक गंभीरराव दौलतराव पाटील (७३) रा. विवेकानंद नगर, करगाव रोड, चाळीसगाव हे दि.२१ रोजी दुपारी ११. ४५ वाजता स्टेट बँकेत पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गेेले होते.त्यांनी दुचाकी बँकेच्या बाहेर लावलेली होती.बँकेतून ८० हजार रूपये काढले व दुचाकीच्या डिक्कीत लाल रंगाच्या पिशवीत ठेवले.दुचाकी सूरू करतांना एक चाक पंचर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुचाकी ढकलतच जवळ असलेल्या पंचर दुकानाकडे नेली.त्याठिकाणी पंचरच्या दुकानदारास पंचर काढण्यास सांगून गंभीरराव पाटील हे बाजुला असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यास गेले. चहा पिवून परत दुचाकीजवळ आले असता त्यावेळी एका इसमाने सांगितले की,तुमच्या दुचाकीच्या डिक्कीतून कुणीतरी अनोळखी लाल रंगाची पॅन्ट घातलेला ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका इसमाने लाल रंगाची पिशवी काढून नेली.
गंभीरराव पाटील यांनी दुचाकीची डिक्की पाहीली असता ती उघडीच दिसून आली.त्यात ठेवलेले लाल रंगाच्या पिशवीत ८० हजाराची रोकड व बँकेचे पासबुक मिळून आले नाही.कोणीतरी अज्ञात चोरट्याने डिक्कीतील पिशवीतून हे पैसे लंपास केल्याने गंभीरराव पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.