अतिवृष्टीमुळे ५ मनुष्यहानी, ३६ गुरांचा मृत्यू : शासनाने आढावा बैठकीत दिली माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी २२ जुलै रोजी आयोजीत कृषी विभाग आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. अलीकडच्या काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९१ टक्के पेरण्या आटोपल्या. तर कपाशीची लागवड ही उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजे १०८ टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले.
जिल्ह्यात दोन महिन्यातील पावसाचा आढावा देखील याप्रसंगी घेण्यात आला. यात जुलैमध्ये आजवर होत असलेल्या सरासरी पावसापेक्षा १३६ टक्के पाऊस जास्त झाला असून जिल्ह्यातील ८६ पैकी ८२ मंडळांमध्ये एकूण सरासरीच्या पन्नास टक्कयांपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जूनपासून आजवर पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी चार लाख रूपये याप्रमाणे शासकीय मदत प्रदान करण्यात आली आहे. तर ३६ गुरांचा मृत्यू झाला असून यासाठी ७ लक्ष २२ हजार रूपये दिलेले आहेत. यावल आणि रावेर तालुक्यातील ३३ गावांमध्ये सुमारे साडेतीनशे घरांची अंशत: हानी झाली असून यासाठी अंदाजे चौदा लक्ष रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता आपत्कालीन पथक तयार करण्यात आले असून त्यांना बचावाचे साहित्य प्रदान करण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.