मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

यावल तालुक्यात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; धरण, धबधबा आणि नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन
यावल | प्रतिनिधी
यावल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वड्री धरण आणि निंबा देवी धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील प्रसिद्ध मनू देवी धबधबाही प्रवाहित झाला असून, नागरिकांसह पर्यटकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असल्याने तसेच नदी-नाले, ओढे आणि पूल परिसरात पाण्याचा प्रवाह धोकादायक झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच पर्यटकांनी धरण परिसर, धबधबा, नदी-नाले, पूल आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः पाण्याखाली गेलेले रस्ते, साकव किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. सेल्फी किंवा पर्यटनाच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









