जळगावसह विविध अग्निशमन दलांच्या बंबांनी संयुक्तपणे आग आटोक्यात आणली; आगीत दोन गायींचा मृत्यू
भुसावळ (प्रतिनिधी) – : भुसावळ एमआयडीसी परिसरातील एन.आर.जे.फर्मा कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लॉट क्रमांक डी.६७ येथे कंपनीला आग लागल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमवरून रात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.


घटनास्थळी पोहोचले असता कंपनी परिसरात आग मोठ्या प्रमाणात भडकलेली होती. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दोन गायी मृतावस्थेत आढळून आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले. आग आटोक्यात आणण्यासाठी जळगाव अग्निशमन दल, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र तसेच वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन बंबांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न केले. विविध ठिकाणांहून दाखल झालेल्या अग्निशमन पथकांनी अथक प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.

या अग्निशमन कार्यवाहीत वा.चा. प्रदीप धनगर तसेच फायरमन सौरभ चिकटे, विठ्ठल पाटील, अहत्तेशाम शेख, सुमित सावळे आणि यश मनोरे यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग अधिक पसरू न देता नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपासणी करण्यात येत आहे. आगीत कंपनीचे नेमके किती नुकसान झाले, याचा तपशील तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे










