फैजपूर पोलिसांची तत्पर कारवाई; दारूच्या नशेत झालेल्या वादातून दगडाने डोक्यात मारून हत्या केल्याचा आरोप
फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालोद गावात दारूच्या नशेत माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एका मजुराची त्याच्याच दोन मित्रांनी दगडाने डोक्यात मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

या घटनेत रमेश ईश्वरसिंग भावर (वय ३५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. तर सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश भावर आणि दोन्ही आरोपी मजुरीचे काम करीत असून त्यांच्यात मैत्री होती. तिघेही एकत्र दारू पिण्यासाठी बसत असत. काल रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास तिघेही बालोद येथे एकत्र दारू पीत होते. यावेळी रमेश याने स्वतःच्या पैशातून मासे विकत आणले होते. हे मासे त्याने मुकेश नावाच्या मित्राकडे जेवण तयार करण्यासाठी दिले होते.
दरम्यान, आरोपी सूरज कोळी याने त्याच्या वडिलांनाही माशांचे जेवण देण्याचा आग्रह केला. यावरून रमेश आणि सूरज यांच्यात वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी दोन्ही आरोपींनी रमेशच्या डोक्यात दगडाने मारहाण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर दुखापतीमुळे रमेश यांचा मृत्यू झाला.
हत्यानंतर आरोपींनी रमेशचा मृतदेह एमएसईबी जवळील सुमारे १०० मीटर अंतरावरील एका खड्ड्यात फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची कार्यवाही सुरू केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.








