भडगाव तालुक्यातील नगरदेवळा स्टेशनजवळ धक्कादायक घटना ; आरोपीला पोलिसांनी केली अटक
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील नगरदेवळा स्टेशनजवळ अवघ्या ८०० रुपयांच्या पैशांवरून झालेल्या वादातून पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या मामे भावाची दगडाने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मा जुगा पवार (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, जुगा कांतिलाल पवार (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दोघेही गावोगावी जाऊन रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मा पवार याने
काल सुमारे ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर दोघे नगरदेवळा स्टेशन परिसरातील एका ठिकाणी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास दारू प्यायले. याचदरम्यान विक्रीतून मिळालेल्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि जुगा पवार याने धर्मा पवार याच्यावर दगडाने हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या हल्ल्यात धर्मा पवार याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोध घेत असताना शेताजवळ काही कुत्रे भुंकत असल्याचा आवाज पोलिसांना ऐकू आला. त्या दिशेने पोलिस गेले असता, शेतात आरोपी जुगा पवार दारूच्या नशेत बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीच्या जवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मृत धर्मा पवार याचे दात आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. आरोपीने मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडून ते बॅगेत ठेवले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळून आली. ही कबुतरे खाण्यासाठी आणली असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी जुगा कांतिलाल पवार याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. ८०० रुपयांच्या किरकोळ आर्थिक वादातून झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे








