जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

सलग ६ तास पूरसदृश भागांची पाहणी
जळगाव :शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (३१ जुलै) पहाटेपासूनच शहरात उतरून सलग ६ तास विविध बाधित क्षेत्रांची पाहणी केली. नाल्यांची सफाई, पाणी साचलेल्या भागांतील अडथळे दूर करणे आणि दुकानदारांना दिलासा देण्याचे काम त्यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडून करून घेतले.
महापौरांनी सकाळीच स्टेडियम कॉम्प्लेक्स, घाणेकर चौक, तुकाराम वाडी आणि पांडे चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अजिंठा चौकात पाण्याचा मोठा वेढा पडल्याने वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय होत होती. पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी महापौरांनी नाल्यांवरील काही दुकानांचे ढापे तोडण्याचे आदेश दिले. नाल्यांमधील गाळ आणि चेंबर साफ करून घेत पाणी प्रवाहित केले. स्वतः रस्त्यावर उभे राहून महापौरांनी हे काम पूर्ण करून घेतले.
महात्मा गांधी मार्केटच्या तळमजल्यावरील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. महापौरांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांसह तेथे भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाच्या गाड्या मागवून दुकानांमधील साचलेले पाणी तातडीने बाहेर काढण्याचे निर्देश त्यांनी दिले, ज्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
पांडे चौकातील रामदेव बाबा मंदिर परिसरात सिंधी कॉलनीवरून तुकाराम वाडी येथे पाणी येऊन तिथे लोकांच्या घरांमध्ये जमा होत होते. त्यामुळे महापौरांनी सकाळी भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांना तात्काळ बोलवले. त्या ठिकाणी कलव्हर्ट तोडून नाल्याचा मार्ग मोकळा करून दिला. तात्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळाल्याने त्यांनी आभार मानले. या वेळेला नगरसेविका आशा पाटील, उपायुक्त निर्मला गायकवाड, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या भाजी विक्रेत्यांना दंडाचे निर्देश
गांधी मार्केट परिसरात काही भाजीपाला विक्रेते रस्त्यावरच कचरा फेकत असल्याचे दिसून आल्यानंतर महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला कठोर पावले उचलण्याचे निर्देश देत कचरा फेकणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ दंड ठोठावण्यास सांगितले. यापुढेही जे विक्रेते रस्त्यावर कचरा टाकतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. यात महापालिका आयुक्त आदित्य जीवने, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी, शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, अभियंता योगेश वाणी आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








