जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील घटना; कोयत्याने वार, महिलेलाही मारहाण व शिवीगाळ
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे जनावरांनी शेतातील मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी चित्राबाई शरद पाटील (वय ४५, रा. लोहटार, ता. पाचोरा) या गोठ्यात गाईचे दूध काढत असताना आरोपी अविनाश राजाराम पाटील याने जनावरांनी त्याच्या शेतातील मका खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली.
आरडाओरड ऐकून फिर्यादींचे पती व मुलगा घटनास्थळी आले असता, इतर आरोपीही तेथे जमले. त्यानंतर झालेल्या झटापटीत अविनाश पाटील याने कोयत्याने फिर्यादींचा मुलगा दीपक याच्या उजव्या हातावर वार केल्याने त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. तसेच इतर आरोपींनी फिर्यादींच्या पतीला लाकडी काठी व पावडीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय महिलेला शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप असून, या प्रकरणी अविनाश राजाराम पाटील, नंदाबाई गुणवंत पाटील, सुमनबाई राजाराम पाटील, गुणवंत राजाराम पाटील आणि राज गुणवंत पाटील (सर्व रा. लोहटार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.









