जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्या बँक लॉकरची झडती घेतली असता, तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात आणि सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाच प्रकरणात झाली होती अटक
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे सहकार विभाग वर्ग-१ चे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी (वय ५६, रा. शांती नगर, यावल रोड, भुसावळ) यांच्यावर दिनांक २० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून कारवाई केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी जगदीश बारी २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
घरझडतीतून लागला लॉकरचा सुगावा
गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने आरोपी जगदीश बारी यांच्या घराची झडती घेतली. या घरझडती दरम्यान बारी यांचे भुसावळ येथील कॉसमॉस बँकेत लॉकर असल्याची माहिती अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार २२ मे २०२६ रोजी दोन पंचांसमक्ष या लॉकरची कसून झडती घेण्यात आली.
लॉकरमध्ये काय काय मिळाले?
लॉकर उघडल्यानंतर एसीबीच्या अधिकार्यांना खालील मुद्देमाल आढळून आला, जो जप्त करण्यात आला आहे:
सोन्याचे दागिने: ९९,०४,९६० रुपये किमतीचे ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याची बिस्किटे.
रोख रक्कम: ८,३६,५०० रुपये रोख (सर्व ५०० रुपयांच्या नोटा).
चांदीचे दागिने: २,६२५ रुपये किमतीचे १०.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने.
एकूण जप्त मुद्देमाल: १,०७,४४,०७५/- रुपये (१ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये).
या पथकाने केली कारवाई
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह लॉकर झडती पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस अंमलदार संगीता पवार, प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांनी ही यशस्वी कारवाई केली.









