
यावल फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ अपघात; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान अखेरचा श्वास
यावल, (प्रतिनिधी ) -: यावल ते फैजपूर मार्गावरील चितोडा गावाजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरत विठ्ठल कोळी (वय २३, रा. रिधूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी यावलहून फैजपूरकडे जाणाऱ्या मार्गावर चितोडा गावाजवळ भरत कोळी यांचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २१ नोव्हेंबर रोजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेमुळे रिधूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








