
तहसीलदार मोहनमाला नाझीर कर यांची प्रत्यक्ष उपस्थितीत धडक कारवाई; अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ
यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील पिंपरी शिवारात तापी नदीकाठी अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार मोहनमाला नाझीर कर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत महसूल विभागाच्या पथकाने चार मोठे डंपर, एक पोकलँड मशीन आणि एक जेसीबी अशी एकूण सहा वाहने पकडली.
तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई करून घेतल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तापी नदी परिसरात सुरू असलेल्या गौण खनिजाच्या वाहतुकीवर महसूल विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारल्याने तालुक्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.या कारवाईनंतर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पकडलेल्या वाहनांबाबत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महसूल विभागाकडून केली जात आहे.










