७७ वर्षीय आजीबाईंचा उत्स्फूर्त सहभाग ठरला आकर्षण; विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शिरसोली, : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरसोली गावात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत विठ्ठल भक्तीचा आनंद लुटला.

विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमले
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच विठ्ठल नामाचा अखंड गजर करत संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारून टाकले. टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दिंडीची शोभा अधिक खुलवली.
७७ वर्षीय आजीबाई ठरल्या दिंडीचे मुख्य आकर्षण
या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील ७७ वर्षीय आजीबाई यांचा उत्स्फूर्त सहभाग. हातात टाळ घेऊन त्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सहभागामुळे दिंडीला भक्तीचा आणि संस्कृतीचा सुंदर वारसा लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पर्यावरण व जलसंवर्धनाचा दिला सामाजिक संदेश
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेशफलक घेत “झाडे लावा, झाडे जगवा”, “पाणी आडवा, पाणी जिरवा” अशा पर्यावरण व जलसंवर्धनाशी संबंधित घोषणांद्वारे ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.
सांस्कृतिक विभागाचे यशस्वी आयोजन
या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण दिंडी भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.








