दर्शनाच्या रांगेत अचानक अस्वस्थ होऊन जयदीप नेमाडे कोसळला; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगाव शहरातील २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जीवनमोती नगर येथील रहिवासी जयदीप नेमाडे हा गेल्या चार-पाच वर्षांपासून मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत जात होता. यंदाही तो मित्रांसोबत पुण्याहून मुंबईत दर्शनासाठी गेला होता. मात्र दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच तो जागेवर कोसळला. जयदीपची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या आकस्मिक घटनेने नेमाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जयदीपच्या निधनाने जळगाव शहरातही हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मुंबईत दाखल होत असतात. दर्शनाच्या ठिकाणी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय सुविधा, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज असल्याची मागणी जयदीपच्या नातेवाईकांनी केली आहे. “आमचा एकुलता एक मुलगा गमावला,” अशी व्यथा व्यक्त करत नेमाडे कुटुंबीयांनी वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.








