मलिकनगर परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली परिसरातील मलिकनगर येथे घरासमोर बांधलेल्या सहा शेळ्या-बोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे २४ हजार रुपये किमतीची सहा जनावरे चोरीस गेली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिकनगर, शिरसोली प्र.न. ता. जळगाव येथील रहिवासी विशाका अमीन हनिफ पिंजारी (वय ४६, व्यवसाय मिस्त्री) यांच्या घरासमोर ही जनावरे बांधण्यात आली होती. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून घरासमोरून शेळ्या-बोकड चोरून नेले.
चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये लाल रंगाची एक बकरी, पांढरी एक बकरी, काळ्या रंगाच्या दोन बकऱ्या तसेच पांढऱ्या-काळ्या रंगाचे दोन बोकड यांचा समावेश आहे. या सहा जनावरांची एकूण किंमत सुमारे २४ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विशाका पिंजारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, एमआयडीसी पोलिस ठाणे, जळगाव करीत आहेत. चोरीस गेलेल्या जनावरांचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.








