शेतातील शेडमधून कपाशी आणि बॅटरी चोरीला


१५ हजारांचा मुद्देमाल लंपास; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा
पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील कळमसरा शिवारात शेतातील शेडमधून दीड क्विंटल कपाशी आणि झटका मशीनची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत शेतकऱ्याचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, प्रवीण प्रकाश डांबरे (वय ३५, रा. कळमसरा, ता. पाचोरा) यांच्या शेतातील शेडमध्ये ठेवलेली १२ हजार रुपये किमतीची दीड क्विंटल कपाशी आणि ३ हजार रुपये किमतीची एक्साईड कंपनीच्या झटका मशीनची बॅटरी चोरीला गेली. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.









