लासूर येथे कर्जबाजारीपणातून वृद्ध शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील लासूर येथील वृद्ध शेतकरी नारायण लोटन बागुल (वय ७०) यांनी शनिवारी (दि. २५ जुलै) सकाळी सुमारे ९ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, बागुल यांच्यावर सहकारी सोसायटीचे तसेच खासगी स्वरूपाचे कर्ज होते. तसेच गतवर्षी शेतीपिकांचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने ते आर्थिक अडचणीत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
नारायण बागुल यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते विश्वास नारायण बागुल व शिवाजी नारायण बागुल यांचे वडील होते.या घटनेमुळे लासूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित घटनेची नोंद पोलिसांनी करून पुढील तपास सुरू केला आहे.









