प्रशिक्षण केंद्राचे वेळापत्रक येईपर्यंत मुख्यालयात राहणार उपस्थिती; शिस्त व तंदुरुस्तीवर भर
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेले नवप्रविष्ट पोलिस अंमलदार रविवारी जळगाव पोलीस मुख्यालयात रुजू झाले. नव्या उमेदवारांच्या आगमनामुळे मुख्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशिक्षण केंद्राकडून अधिकृत शेड्यूल प्राप्त होईपर्यंत हे सर्व अंमलदार मुख्यालयात कार्यरत राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.


पोलीस सेवेत आवश्यक असलेली शारीरिक व मानसिक तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने रविवारी सकाळी मुख्यालयात विशेष योगा क्लासचे आयोजन करण्यात आले होते. या योगा सत्रात नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम व ध्यान प्रकारांचा सराव केला.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना पोलीस दलातील जबाबदाऱ्या पार पाडताना मानसिक संतुलन आणि शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे तणाव नियंत्रणास मदत होत असून, सेवेत कार्यक्षमता वाढण्यासही लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशिक्षण केंद्राचे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर संबंधित नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांना पुढील प्रशिक्षणासाठी विविध केंद्रांवर पाठविण्यात येणार आहे. तोपर्यंत मुख्यालयात त्यांना प्राथमिक मार्गदर्शन, शिस्तबद्धता तसेच दैनंदिन पोलीस कामकाजाची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.









