कुंटणखान्यावर कारवाईनंतर तपासात धक्कादायक माहिती उघड; बनावट आधारकार्डाचाही संशय
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवित एका महिलेकडून धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. तपासादरम्यान संबंधित महिला ही बांगलादेशातील रहिवासी असल्याचे समोर आले असून, तिच्याकडे आढळलेले आधारकार्डही बनावट असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे CRN-151/26 अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने दिनांक 21 मे 2026 रोजी निमखेडी रोड परिसरातील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती.
या प्रकरणात सागर सोनवणे (रा. धरणगाव) व सीमा उर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आशादीप संस्थेत दाखल करण्यात आले.
दरम्यान, तपास अधिक खोलात नेत पोलिसांनी संबंधित महिलांची सखोल चौकशी सुरू केली. यावेळी एका महिलेने सुरुवातीला आपली खरी ओळख सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी “प्रॉक्टिव्ह अप्रोच” स्वीकारत तिच्या मोबाईलची तपासणी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण तसेच बायोमेट्रिक पडताळणी केली असता, तिच्याकडील आधारकार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत जाकिया अबुल काहेर फोकर (वय 28) ही महिला बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संबंधित महिला भारतात कशी दाखल झाली, तिच्याकडे बनावट कागदपत्रे कोणी तयार करून दिली, तसेच या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.









