तांत्रिक विश्लेषण व CCTVच्या आधारे शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बालाजीपेठ परिसरात चांदीचे दागिने बनविणाऱ्या कारागिराला शॉक मशिनद्वारे विद्युत धक्का देऊन दागिने लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत गुन्ह्याचा छडा लावला.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजीपेठेतील आर. एल. ज्वेलर्सच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर भरत वसंतराव भामरे हे चांदीचे दागिने बनविण्याचे काम करतात. १६ मे रोजी दुपारच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका संशयिताने काळ्या रंगाच्या शॉक मशिनच्या सहाय्याने भामरे यांना विद्युत धक्का दिला. त्यानंतर त्यांना बेशुद्ध करून जवळील चांदीचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक खेडकर हे या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासादरम्यान संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ तसेच भुसावळकडे जाणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.
तांत्रिक विश्लेषणातून संशयित हा भुसावळमधील कंडारी शिवार परिसरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक राजेंद्र शर्मा (वय ३१, रा. साकरी फाटा, शिवकॉलनी, भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच १९ बीके ८७७५ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली असून गुन्ह्यावेळी परिधान केलेले कपडे आणि मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस तपासात संशयिताविरुद्ध यापूर्वी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी साजिद मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खेडकर तसेच गुन्हे शोध पथकातील योगेश जाधव, निलेश घुगे, अमोल वंजारी, पराग दुसाने, योगेश साबळे, काजल सोनवणे आणि नेत्रम विभागाचे मुबारक देशमुख यांनी ही कारवाई केली.









