ईको कारच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंच्या पावडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
महामार्गावरील नाकाबंदीत वॅगनार अडवली; ३ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ५ ते ६ किलो ‘सायलेंसर माती’ जप्त
मुद्देमालाची किंमत सुमारे ५० हजार रुपये; मुंबई-ठाणे परिसरातील चोऱ्यांबाबतही तपास सुरू
पारोळा (प्रतिनिधी) : ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडिअमसारख्या मौल्यवान धातूंच्या घटकांची चोरी करून त्यांचा अवैध व्यापार करणाऱ्या टोळीचा पारोळा पोलिसांनी व महामार्ग पोलिस यांच्या सयुक्त कारवाई करुन पर्दाफाश केला आहे. पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी संशयास्पद वॅगनार कारची तपासणी केली असता सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान मारुती सुझुकी वॅगनार (क्र. DL-3-CBU-3358) ही संशयास्पद कार अडवून तिची झडती घेण्यात आली. वाहनामध्ये आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) हे आढळून आले.
वाहनाची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून जुन्या वापरलेल्या ईको वाहनांचे तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच त्यामधील अंदाजे ५ ते ६ किलो ‘सायलेंसर माती’ अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पावडर आढळून आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ईको वाहनांना बनवित होते लक्ष्य
प्राथमिक चौकशीत संशयितांकडून विशेषतः मारुती सुझुकी ईको वाहनांमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या पद्धतीने काढून त्यातील मौल्यवान घटकांची विक्री व व्यापार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ईको वाहनांची ग्राउंड क्लीअरन्स तुलनेने जास्त असल्याने वाहनाखाली सहज जाता येते. तसेच कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कमी वेळेत काढता येत असल्याने ही वाहने चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये असतात मौल्यवान धातू
वाहनाच्या धुरामधील घातक वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या आतील ‘हनीकॉम्ब’ रचनेवर प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअम यांसारख्या मौल्यवान धातूंचा वापर केला जातो. या धातूंना बाजारात मोठी किंमत असल्याने त्यांच्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करून त्यातील घटकांची विक्री करण्याचे प्रकार होत असल्याचे तपासातून समोर येत आहे.
मुंबई-ठाणे परिसरातील चोऱ्यांचाही तपास
प्राथमिक चौकशीत संशयितांनी मुंबई व ठाणे परिसरात अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत किंवा नाहीत, याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. या टोळीचे आणखी सदस्य, चोरीचा माल कोणाला विकला जात होता तसेच या मौल्यवान धातूंच्या पावडरीचा पुढे नेमका वापर अथवा व्यापार कुठे केला जात होता, याचा तपास सुरू आहे.
नाकाबंदीमुळे चोरीचा नवीन प्रकार उघड
राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या नाकाबंदीच्या वेळी संशयास्पद वाहनाची बारकाईने तपासणी केल्यामुळे चोरीची ही आगळीवेगळी पद्धत उघडकीस आली. पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
सदर प्रकरणी संशयित व्यक्ती आणि त्यांच्या ताब्यात मिळालेल्या मुद्देमालाच्या अनुषंगाने BNS कलम 303, 317(2), 317(4), 317(5), 324(4), 324(5) सह मोटार वाहन कायदा कलम 184, 199A अन्वये कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपासात या टोळीचे संपूर्ण नेटवर्क आणि चोरीच्या मालाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








