अवैध धंद्यांबाबत वरिष्ठांकडे झालेल्या तक्रारींची दखल घेतल्याची चर्चा; गुरुवारी सायंकाळी बदलीचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास यासंदर्भातील आदेश काढण्यात आल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या बदलीमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात शनिपेठ पोलीस ठाणे अतिसंवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. सुमारे वर्षभरापूर्वी रावेर येथून बदली होऊन आलेल्या डॉ. विशाल जयस्वाल यांच्याकडे शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी होत असल्याची चर्चा होती. या तक्रारींची दखल घेत डॉ. जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गुरुवारी सायंकाळी बदलीचे आदेश जारी झाल्याची माहिती असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या बदलीला दुजोरा दिल्याचे समजते. या अचानक झालेल्या प्रशासकीय निर्णयामागील नेमकी कारणे आणि शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पुढील प्रभारीपदाची जबाबदारी कोणाकडे सोपविली जाणार, याकडे आता पोलीस दलासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.









