जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १० दिवसांच्या चिमुकल्या नवजात बालिकेला उघड्यावर टाकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिमुकलीचे प्राण वाचवणाऱ्या तरुणाचे कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?
दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास, गिरणागाव – पिंप्राळा रेल्वे पुलालगत असलेल्या आझादनगरकडून पिंप्राळाकडें जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला एका निर्जन स्थळी अवघ्या १० दिवसांच्या चिमुकल्या स्त्री जातीच्या अर्भकाला टाकून देण्यात आले होते. सदर परिसर मृत जनावरे टाकण्यासाठी वापरला जात असल्याने अत्यंत दुर्गम व अस्वच्छ आहे. आई-वडील किंवा कायदेशीर पालकत्व असलेल्या अज्ञात व्यक्तीने या चिमुकलीला उघड्यावर बेवारस सोडून पळ काढला. अर्भकाला मुंग्या चावत असतानाच हरी विठ्ठल नगर येथे राहणारे शिवाजी मधुकर गायकवाड (वय ३५, व्यवसाय – पेंटर) यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी अजिबात वेळ न दवडता तत्काळ त्या बालिकेला सुरक्षितस्थळी हलवून पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा क्र. ३११/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९३ आणि अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलम ७५ व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घेतली भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे भेट देऊन त्या लहान चिमुकलीची विचारपूस केली. तिची प्रकृती व पुढील देखभालीबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी व बालकल्याण समितीशी चर्चा करण्यात आली. तसेच, ऐनवेळी प्रसंगावधान दाखवून चिमुकलीचे प्राण वाचवणारे आणि पोलिसांना वेळेत सहकार्य करणारे पेंटर शिवाजी मधुकर गायकवाड यांच्या समयसूचकतेचे व संवेदनशीलतेचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.
पोलीस आता या निष्पाप बालिकेला बेवारस सोडणाऱ्या निर्दयी पालकांचा शोध घेत आहेत.








