जळगाव (विशेष प्रतिनिधी): धर्मवीर फाऊंडेशन जळगाव, आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव (एमएसडब्ल्यू)द्वितीय वर्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कानळदा येथील आदर्श विद्यालय व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लाठी-काठी, दांडपट्टा व योग प्रात्यक्षिकांचा विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आजच्या डिजिटल युगात तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात असून त्यांना या व्यसनापासून परावृत्त करणे, त्यांच्यात मैदानी खेळ, धैर्य, शौर्य कला आणि योगाची आवड निर्माण करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाच्या क्षेत्रकार्य ग्रुपतर्फे (कानळदा) आयोजित या उपक्रमात धर्मवीर शिवकालीन आखाडा व व्यायामशाळा, तसेच धर्मवीर आखाडा (फैजपूर-यावल) यांच्या टीमने सहभाग घेतला.
यावेळी आखाड्याच्या खेळाडूंनी लाठी, काठी आणि दांडपट्टा फिरवण्याची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. सोबतच योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून दैनंदिन जीवनात आरोग्य व स्वसंरक्षणाचे काय महत्त्व आहे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शस्त्र आणि स्वसंरक्षण कला आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमास आदर्श महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, धर्मवीर फाऊंडेशन अध्यक्ष मिलन वाघोदेकर व धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष:- महेश वाघोदेकर व त्यांची टीम, तसेच एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी लीना भोवर, श्रुती चौधरी, अस्मिता भोये व जगन उदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपस्थितांनी विशेष परिश्रम घेतले.








