१६ विद्यार्थ्यांसह २१ जखमी
पाचोरा( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ पाचोरा येथून सातगाव डोंगरीला जात असलेला ट्रक हा सातगाव (डोंगरी) येथुन निघालेल्या पाचोरा आगाराच्या बसवर जावून धडकल्याने अपघात झाला. यात बस मधील १६ शाळकरी विद्यार्थी, बसचालक व एका महिलेसह २१ जण किरकोळ जखमी झाले. अपघात घडताच ट्रक चालकाने आपले वाहन सोडून घटनास्थळावरुन पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे १०८ रुग्णवाहिका चालक नरसिंग भुरे यांनी जखमींना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातात जखमींमध्ये बहुतांशी विद्यार्थी श्री. गो. से. हायस्कूलमध्ये व कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे असल्याने ग्रामीण रुग्णालयात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संचालक सतिश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष विकास पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, कै. पि. के. शिंदे विद्यालयाचे चेअरमन पंडित शिंदे, सचिव शिवाजी शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, गो. से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना चहा व बिस्कीट घेऊन त्यांना आधार दिला. जखमींवर डॉ. सतीष टाक, डॉ. अमित साळुंखे यांनी उपचार केले.
पाचोरा तालुक्यातील पाचोरा आगाराची सातगाव (डोंगरी) येथुन बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. १६१८ ही सकाळी साडेसहा वाजता निघाल्यावर मोंढाळे गावाजवळ असलेल्या नाल्यावर येत असतांना सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथून सातगाव (डोंगरी) कडे भरधाव वेगाने जात असलेला ट्रक क्रमांक एम. एच. १९ सी. वाय. ७५२१ हा बसवर जावून धडकल्याने या अपघातात बसमधील गौरव राजपूत, पुष्कर पाटील, साक्षी पाटील, अजय कोळी, पुजा मनगटे, मोती चव्हाण, प्रियंका वाघ, निता राठोड, जतीन महाले, प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, हितेश चव्हाण, रोशन परदेशी, गोपाल चव्हाण, रामदास मनगटे, रमेश पाटील, भिवसन वाघ सर्व रा. सातगाव (डोंगरी), बस चालक मधुकर बडगुजर (वय – ४५) रा. लोहारी, दिपक पवार रा. नांदगाव तांडा, प्रणाली राऊतराय रा. प्रिंप्री, मिना तडवी रा. सार्वे यांना नाक तोंड, पायावर व डोक्यावर जखमा झाल्या आहेत. जखमींवर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार करुन किरकोळ जखमींना सुखरूप घरी पोहचविण्यात आले आहे.