मित्राला आरोपी न करण्यासाठी मागितली तीन लाखांची लाच
भुसावळ येथे धुळे अँटीकरप्शनची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये मित्राला सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस नाईक तुषार पाटील व खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.
जळगाव एलसीबीने काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर पकडून बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता. त्यानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला शुक्रवारी गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात लाखांची मागणी करण्यात आली. सुरूवातीला ३ लाख रुपये घेवून नंतर पुन्हा १२ लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला.
ऋषी शुक्ला व तुषार पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर पोलीस निरीक्षकांसाठी लाच मागण्यात आल्याने त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, सुधीर मोरे या सहकार्यांनी केली.