
जळगाव ( प्रतिनिधी ) :- महावितरणच्या 21 वा वर्धापन दिन जळगाव परिमंडलात उत्साहात साजरा करण्यात आला.


जळगाव परिमंडलातील ‘प्रकाशदीप’ सभागृहात आयोजित या सोहळ्यात कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्य अभियंता मुलाणी यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून महावितरणमध्ये होत असलेले तांत्रिक बदल स्वीकारण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. स्मार्ट मीटरबाबत वीजग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे ही आपली जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांनी या तंत्रज्ञानाविषयी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. स्मार्ट मीटरचे फायदे ग्राहकांना समजून सांगावेत. गेल्या 21 वर्षांत कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि अथक परिश्रमांच्या बळावरच महावितरणने ग्राहकसेवा, तांत्रिक आधुनिकीकरण, सुरक्षितता आणि विश्वासार्ह वीजपुरवठा यामध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात सर्वांना विद्युत सुरक्षा शपथ देण्यात आली. या सोहळ्याला अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी, व्यवस्थापक तन्वी मोरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन, उपकार्यकारी अभियंता किरण महाजन यांच्यासह परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तायडे यांनी केले.
कॅप्शन : महावितरणचा वर्धापनदिन जळगाव परिमंडलात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्यासहअधिकारी, कर्मचारी.








