जळगाव : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यावर वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम सुरु केली आहे. शुक्रवारी अशा ३ ग्राहकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणने नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी संजय भगवान महाजन या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्याने थकबाकी भरली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने घराशेजारी असलेल्या लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी केल्याचे आढळले. या ग्राहकाने २१२० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात सुप्रीम कॉलनीतील येथील रहिवासी अकिब शाह अब्दुल रहमान शाह या ग्राहकाने थकबाकीसाठी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृत वीजवापर केला. या ग्राहकाने १२३० रुपयांची वीजचोरी केली. महावितरणचे सहायक अभियंता विशाल नेमाडे यांच्या फिर्यादीवरून या २ जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.











