जळगाव (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा ‘न्याय विश्वास फाउंडेशन’चे संस्थापक ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी मारहाण झालेल्या एका रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. पीडित रिक्षाचालकाला सोबत घेऊन त्यांनी थेट जळगाव शहर पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर त्याची बाजू मांडली. त्यांच्या या पुढाकारामुळे पीडित रिक्षाचालकाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव शहरात गजानन माळी या रिक्षाचालकाला एका कारचालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच संबंधित कारचालकाने बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपही रिक्षाचालकाने केला आहे. संबंधित कारचालक मोठ्या पदावरील शासकीय अधिकारी असल्याने तक्रार देऊनही पोलिसांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना पीडित रिक्षाचालकाने व्यक्त केली. त्यामुळे हताश झालेल्या रिक्षाचालकाने न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम यांच्याकडे मदतीची मागणी केली.
सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या ॲड. निकम यांनी रिक्षाचालकाची व्यथा समजून घेत त्याला मदतीचा हात दिला. त्यानंतर त्यांनी पीडित रिक्षाचालकाला सोबत घेऊन थेट जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच रिक्षाचालकावर झालेल्या कथित अन्यायाची गांभीर्याने दखल घेऊन त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
ॲड. निकम यांनी मांडलेल्या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. ॲड. अनिकेत निकम यांनी केवळ आश्वासन न देता स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पीडिताची बाजू मांडल्याने एका कष्टकरी रिक्षाचालकाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले आहे. सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी दाखविलेली सामाजिक बांधीलकी सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.









