जळगाव शहरात नेहरु चौकाजवळ घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील नेहरु चौकाजवळील खान्देश मॉल परिसरातील सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या मेळ्यात एका तरुणावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याच्या जवळील १५०० रुपये जबरीने काढून घेण्यात आले आहेत. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अरबाज शकील शेख हसन (वय २६, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हा तरुण १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ९:१५ वाजेच्या सुमारास नेहरु चौकाजवळील खान्देश मॉल परिसरातील सार्वजनिक जागेत सुरू असलेला मेळावा चालवत होता. तो लोकांकडून तिकिट तपासून लोकांना मेळ्यात सोडत असताना काही जण तेथे आले.
आरोपींनी “इतने टाईमसे मेला लगारे हमारे को पैसे नही देरे किसे पुछके मेला लगारे” असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपी सागर हिरामण कोळी व इतर दोन जणांनी मिळून मेळ्याच्या ठिकाणी फिर्यादीच्या डाव्या कानामाग मारहाण केली.
यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील १५०० रुपये जबरीने काढून घेतले. तसेच मेळावा पाहण्यासाठी आलेला मो. अनस खान खलील खान यांनाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या कानाजवळ चॉपरसारख्या धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी सागर हिरामण कोळी (वय २४, रा. उज्ज्वल चौक, कांचननगर, जळगाव) याला १३ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड (नेमणूक जळगाव शहर पोलीस ठाणे) हे करीत आहेत.









