सांगवी शिवारातील घटना; पाच व तीन क्विंटल कापसावर चोरट्यांचा डल्ला
पाचोरा (प्रतिनिधी) : – पाचोरा तालुक्यातील सांगवी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील कापूस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. पाच क्विंटल आणि तीन क्विंटल अशा एकूण आठ क्विंटल कापसाची चोरी झाली असून, त्याची अंदाजित किंमत ७२ हजार रुपये आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील शेतकरी अधिकार अमृत पाटील (वय ३८, रा. सांगवी, ता. पाचोरा) यांच्या शेतातील गट क्रमांक ११२ व ११३ मधील कापूस अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरट्यांनी अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचा पाच क्विंटल कापूस तसेच २७ हजार रुपये किमतीचा तीन क्विंटल कापूस चोरून नेला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









