नेटवर्क मार्केटिंगच्या आमिषाने निवृत्त सैनिकाला साडेचार लाखांचा गंडा


पैसे परत मागितल्यावर पोलीस ठाण्याबाहेर मारहाण; मुलीला नुकसान पोहोचवण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा
चोपडा : नेटवर्क मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त सैनिकाची ४ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे परत मागितल्यावर तक्रारदार व त्यांच्या पत्नीला पोलीस ठाण्याबाहेर शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या मुलीला नुकसान पोहोचविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्यूनेटमध्ये गुंतवणुकीचे आमिष
चोपडा शहरातील शाहूनगर परिसरात राहणारे निवृत्त सैनिक शाम चिंतामण वाघ (वय ५१) यांची जिल्हा सैनिक बोर्ड, जळगाव येथे तात्पुरते लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या किशोर महाजन याच्याशी ओळख झाली होती. त्यातून महाजन याच्यासह रवींद्र बोडके आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी संगनमत करून ‘क्यूनेट’ (Qnet) नेटवर्क मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींवर विश्वास ठेवून वाघ यांनी स्वतःच्या, पत्नीच्या आणि मुलाच्या नावाने एकूण ४ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन भरले. मात्र, बराच कालावधी उलटूनही अपेक्षित परतावा किंवा गुंतवलेली रक्कम मिळाली नाही. त्यामुळे वाघ यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस ठाण्याबाहेर मारहाण
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघ यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीसाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी ते पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी पैसे परत करण्याचा विषय पोलीस ठाण्याबाहेर सोडवून देतो, असे सांगून वाघ दाम्पत्याला बाहेर बोलावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर गेल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास नकार देत वाघ आणि त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच बाहेर शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलीला नुकसान पोहोचवण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शाम चिंतामण वाघ यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात BNS कलम ३१६, ३१८(३), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर किशोर हिरे करीत आहेत.









