रावेरला प्रथमच रोजगार मेळावा; ४५ तरुणांची प्राथमिक निवड


भर पावसातही ११५ उमेदवारांची नोंदणी; सात नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती
रावेर : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रावेर येथे प्रथमच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. केतकीताई पाटील फाउंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सरदार जी. जी. हायस्कूलच्या सहकार्याने मंगळवारी (दि. ११) झालेल्या या मेळाव्याला भर पावसातही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात ११५ उमेदवारांनी नोंदणी केली असून ४५ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते उद्घाटन
सरदार जी. जी. हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावेर नगराध्यक्षा संगीता महाजन, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ धनके, माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, सरदार जी. जी. हायस्कूलचे चेअरमन संतोषशेठ अग्रवाल, विवरेचे माजी सरपंच वासुदेव नरवाडे, जळगाव पूर्वच्या भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डॉ. केतकी पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील, भाजप रावेर उत्तर मंडळाध्यक्ष रवींद्र पाटील, रोजगार कौशल्य केंद्राचे दिनेश चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सात कंपन्यांकडून थेट मुलाखती
मेळाव्यासाठी जळगाव, चोपडा, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील सात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. परिसरातील बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नोंदणी केली. विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांच्या थेट मुलाखती कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घेतल्या.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव लक्षात घेऊन कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ४५ उमेदवारांची प्राथमिक निवड केली. त्यामुळे निवड झालेल्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामीण तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी
रावेर परिसरातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच रोजगार मेळावा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. रोजगारासाठी शहरांकडे धाव घेणाऱ्या तरुणांना त्यांच्या परिसरातच संधी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव नरवाडे यांनी केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या सातही कंपन्यांच्या प्रतिनिधींचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. केतकी पाटील यांनी आभार मानले.









