जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ बेकायदेशीररित्या विनापरवाना गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या एका तरुणासह त्याला कट्ट्याची विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधाराच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही धडक कारवाई २४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

समीर खान जावेद खान (वय २५, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) आणि त्याला गावठी कट्टा विकणारा जावेद शेख सलीम शेख (रा. दत्तनगर, मेहरुण, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अशी झाली कारवाई…
तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात राहणारा समीर खान हा तरुण २४ जून रोजी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची आणि परिसरात दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि संशयित समीर खान याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा मिळून आला.
विक्रेताही पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी समीर खान याला खाकी वर्दीचा इंगा दाखवत कसून चौकशी केली असता, त्याने हा कट्टा मेहरुणमधील दत्तनगर भागात राहणाऱ्या जावेद शेख सलीम शेख याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ न गमावता तात्काळ सूत्रे हलवून संशयित विक्रेता जावेद शेख यालाही दत्तनगर परिसरातून ताब्यात घेतले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व विक्री केल्याप्रकरणी आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार (सफौ) विजयसिंग पाटील करत आहेत. जळगाव शहरात अवैध शस्त्रे कुठून येत आहेत, याचा कसून शोध आता पोलीस घेत आहेत.









