जळगाव (प्रतिनिधी) : प्रतिनिधी तालुक्यातील धोबी वराड येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबाच्या घरात जबरदस्तीने घुसून तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर घरातील महिलांवर कुऱ्हाड उगारून जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. ही घटना २४ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण सोनवणे, दीपक सोनवणे, नितीन सोनवणे आणि त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम (सर्व रा. धोबी वराड, ता. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अशी घडली घटना…
धोबी वराड येथील रहिवासी आणि शेती काम करणारे सोनू मधुकर जाधव (वय ३०) यांच्यासोबत संशयितांचा जुना वाद होता. २४ जून रोजी सकाळी सोनू जाधव यांच्या पत्नी आणि आई घराबाहेर उभ्या होत्या. याच वेळी जुन्या वादाची कुरापत काढून संशयित अरुण सोनवणे, दीपक सोनवणे, नितीन सोनवणे व त्यांच्यासोबतच्या एका अनोळखी व्यक्तीने थेट जाधव यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला.
भावाला मारहाण; महिलांवर उगारली कुऱ्हाड
संशयितांनी घरात घुसताच आरडाओरड करत सोनू जाधव यांच्या भावाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरात उपस्थित असलेल्या सोनू यांच्या पत्नी आणि आई मध्यस्थी करण्यासाठी धावल्या असता, संशयित अरुण सोनवणे याने थेट कुऱ्हाड उगारून सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
या भ्याड हल्ल्यानंतर सोनू मधुकर जाधव यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अरुण सोनवणे, दीपक सोनवणे, नितीन सोनवणे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध बेकायदेशीर घरात घुसणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक (पोना) किरण पाटील करत आहेत.









