उपमहापौर मनोज चौधरी यांचे संबंधित विभागांना स्पष्ट आदेश
जळगाव ( प्रतिनिधी ) – दीडशे वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या आणि संत आप्पा महाराज यांनी सुरू केलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी श्रीराम रथोत्सव आणि वहन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गांची तातडीने व सखोल स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.


कार्तिक शुक्ल एकादशीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या ऐतिहासिक उत्सवात प्रभू श्रीरामाच्या रथासह विविध वहनांच्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या उत्सवात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील कचरा उचलणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, नाले व गटारींची सफाई करणे तसेच आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना उपमहापौर चौधरी यांनी दिल्या. उत्सवापूर्वी तसेच उत्सवादरम्यान स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
या आढावा बैठकीस उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे समीर बोरोले तसेच BVG संस्थेचे व्यवस्थापक रेड्डी, जाधव आणि राठोड उपस्थित होते. बैठकीनंतर उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना मिरवणूक मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेच्या कामाला तातडीने गती देण्याच्या सूचना केल्या. श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था चोख ठेवण्यावर महानगरपालिकेचा भर राहणार आहे.








