चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (प्रतिनिधी): धरणगावकडून भरधाव वेगाने चोपडा शहराकडे येणाऱ्या एका कंटेनरने अमळनेरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याची भीषण घटना रेल मारुती मंदिराजवळ नुकतीच घडली. या अपघातात दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेला मित्र असे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, धडक बसल्यानंतर अब्दुल कादीर आसिक हुसेन व त्यांचा मित्र अब्दुल हमीद मोहम्मद इस्माईल सिकलगार हे दोघेही भररस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दुचाकी चालक अब्दुल कादीर यांच्या उजव्या पायावर गुडघ्याखाली कंटेनरचे मागील चाक फिरल्याने पायाचा चेंदामेंदा होऊन गंभीर फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्यांना आपला पाय गमावावा लागला आहे. तर मागे बसलेले अब्दुल हमीद मोहम्मद इस्माईल सिकलगार यांच्या काखेला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणाबाबत अब्दुल हमीद मोहम्मद इस्माईल सिकलगार (वय ५१, रा. मास्टर कॉलनी, चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कंटेनर (क्रमांक एचआर ५५ डब्ल्यू १०९८) चा चालक बलराम ओमप्रकाश दलाल (वय ३३, रा. चिडीचेरी, ता. जि. रोहतक, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.





