सीसीटीव्हीत बालक कैद, पारोळा शहरातील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – डेअरी मालकाने दुधाचे पेमेंट करण्यासाठी बँकेतून काढलेल्या पैशांवर एकाने शिताफीने डल्ला मारून दुचाकीला लावलेली एक लाख दहा हजार रुपये रक्कम असलेली पिशवी लंपास केली. ही घटना नाक्याजवळ बुधवारी (ता. ४) दुपारी चारच्या सुमारास घडली. विशेष गोष्ट म्हणजे घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एक दहा ते बारा वर्षाचा मुलगा येथे घेऊन जाताना दिसत आहे घटने प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सेंट्रल बँकेत दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास घडना घडली. सुनील हिंमतराव पाटील (रा. टिटवी, ता. पारोळा) हे आपल्या गावी टिटवी येथे दुधाचा व्यवसाय करतात. ग्राहकांना दुधाचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी पारोळा येथील सेंट्रल बँकेतून सुमारे एक लाख दहा हजार रुपये काढले. ते पैसे एका पिशवीत ठेवले व दुचाकीच्या हँडलला टांगून ते कजगाव रस्त्यावर पोहोचले. तेथे आपल्या नातेवाइकाला बसमध्ये बसविण्यासाठी थांबले असता एका अज्ञात दहा ते बारा वर्षीय मुलाने दुचाकीला टांगलेली पैशांची पिशवी काढून पोबारा केला.
काही क्षणातच त्यांना पैशांची पिशवी गायब असल्याचे लक्षात आले असता लगेच आरडाओरड केली. परंतु चोरटा लगेच पसार झाला होता. याबाबत घटनास्थळी लगेच पोलिसांनी धाव घेतली असता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दहा ते बारा वर्षीय अल्पवयीन चोरटा पिशवी चोरून पसार होत असल्याचे चित्रीकरण दिसत होते. येणाऱ्या काळात पोलिसांना चोर शोधण्याचे मोठे आव्हान आहे. म्हणून याबाबत पारोळा पोलिसात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.