शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निषेध आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) :- नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लोकसेवक असलेल्या खासदारांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी निषेध करीत गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी जोरदार आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करीत खासदार हेमंत पाटील यांच्या गैरकृत्याचा निषेध केला. डॉक्टरांविषयीचे गैरवर्तन महाराष्ट्रात थांबले नाही तर भविष्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनामधून देण्यात आला आहे.
अधिष्ठाता हे वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोच्च पद आहे. विभाग प्रमुख सुद्धा प्रशासकीय सर्वोच्च पद आहे. दोन्ही पदावर असलेल्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेला खासदार हेमंत पाटील यांच्या गैरकृत्यामुळे डाग लागला आहे. ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी मान खाली घालणारी आहे. एक तर सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि अपुरी साधनसामग्री यामुळे डॉक्टर्स मंडळी आहे त्यात प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा बजावत आहेत. तरीदेखील त्यांच्याविषयी लोकसेवक गैर वर्तणूक करीत असल्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. यामुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात अडथळा येत आहेत.
लोकसेवक हेमंत पाटील यांनी केलेल्या गैर कृत्याचा निषेध म्हणून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, कनिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना (मार्ड) आणि महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनांतर्फे घोषणाबाजी देत गुरुवारी अधिष्ठाता कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी संबंधित दोषींवर राज्य शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांना देण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. किशोर इंगोले, डॉ. संगीता गावीत, डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. संजय बनसोडे, डॉ. कुणाल देवरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. रोहन पाटील, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. सुनयना कुमठेकर यांच्यासह कनिष्ठ निवासी डॉक्टर्स संघटनेचे (मार्ड) अध्यक्ष डॉ. गोपाल बाजड, डॉ. तुषार राठोड, डॉ. नम्रता वाघ उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेचे सचिव आदिनाथ काळणार, सर्वेश काबरा, अनुष्का मानधे, कृष्णा कराड, ओमकार वरुडे, गौरव काटोले, अक्षय साळवे, शितल बलाना आदींनी सहभाग घेतला.