न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे कारागृहातून घेतले ताब्यात; तिघांविरुद्ध आधीच गुन्हे दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून २७९ जणांची तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे असोसिएट्स कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर (दोघे रा. गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांना ठाणे कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.


या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेला मुख्य एजंट मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१, रा. शिवकॉलनी, जळगाव) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत कंपनीच्या व्यवहारांबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील टीडब्ल्यूजे असोसिएट्स कंपनीमार्फत मोठ्या परताव्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्यात आले होते. मात्र ठरलेला परतावा न देता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात कंपनीचे मुख्य संचालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश रामकृष्ण घाग तसेच जळगाव शाखेचा मुख्य एजंट मिलिंद पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
दरम्यान, टीडब्ल्यूजे असोसिएट्सविरोधात राज्यातील विविध भागांत एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यातही कंपनीविरोधात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने समीर आणि नेहा नार्वेकर या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना २९ मेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.








