मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जामनेर येथे पक्षप्रवेश; सहकार वर्तुळात चर्चांना उधाण
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील यांनी रविवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या राजकीय घडामोडीमुळे जळगावच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जामनेर येथे झाला पक्षप्रवेश
डॉ. अरुण पाटील यांनी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर उपस्थित होते.
गुलाबराव देवकर यांचे समर्थक म्हणून ओळख
डॉ. अरुण पाटील हे अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
बाजार समितीत भाजपचा प्रभाव वाढल्याची चर्चा
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्यानंतर समितीत भाजपचा प्रभाव वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच डॉ. अरुण पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील म्हसावद गटातही भाजपचे प्राबल्य वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.









