जळगाव ( प्रतिनिधी):- जळगाव शहरातील गजबजलेल्या नवीन बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोराने ७० वर्षीय वृद्धाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा तालुक्यातील वडी येथील वृद्ध शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वडी येथील रहिवासी रमण कौतीक पाटील (वय ७०, व्यवसाय-शेतमजुरी) हे आपल्या पत्नी यमुनाबाई रमण पाटील यांच्यासह २२ मे २०२६ रोजी दुपारी जळगाव शहरात आले होते. दुपारी सुमारे २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास नवीन बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने यमुनाबाई यांच्या गळ्यातील अंदाजे १० ते १२ वर्षांपूर्वी घेतलेली सोन्याची पोत (ज्यात सोन्याचे मणी आणि मंगळसूत्राचे पदक होते) अत्यंत शिताफीने ओरबाडून चोरून नेली. चोरीला गेलेल्या या ९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ३० हजार रुपये इतकी आहे.
बस स्थानकावरून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पीडित वृद्ध दाम्पत्याने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. रमण कौतीक पाटील यांच्या फिर्यादीवरून २३ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी जिल्हापेठ पोलिसांत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी तातडीने तपास चक्र फिरवली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार शरीफ शेख करत आहेत.









