भुसावळ, (प्रतिनिधी) – शहरातील पंचशील नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ४६ हजार २०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील नगर येथील रहिवासी शुभम विनायक जामनेकर (वय ३२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ७ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून हॉलमधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याची अंगठी, गोलमणी, मंगळसूत्राचे वाटे, सोन्याचे मणी, ब्रेसलेट तसेच चांदीचे पैजण व जोडवे यांचा समावेश असून एकूण किंमत १,४६,२०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ. कांतीलाल रघुनाथ केदारे करीत आहेत.









