बँरकमध्ये जाण्यास सांगितल्यावरून मारहाण; सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा
जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये एका बंदीने पोलिस रक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ येथे कार्यरत असलेले पोलिस रक्षक काशिनाथ कारभारी मोटे (वय २६) हे ८ जून रोजी सकाळी ११ ते ११.१५ वाजेदरम्यान कर्तव्यावर होते. त्यावेळी बंदी वेळ संपल्यानंतर त्यांनी कैदी सुनील यशवंत नन्नवरे (रा. पालधी, ता. धरणगाव, जि. जळगाव) यास नियमानुसार बॅरकमध्ये जाण्यास सांगितले.
मात्र याचा राग आल्याने सुनील नन्नवरे याने पोलिस रक्षक काशिनाथ मोटे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने मोटे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत पोलिस रक्षकांच्या गणवेशावरील खाकी शर्टाची दोन बटणे तुटली असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.
घटनेनंतर कारागृह प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिस रक्षक काशिनाथ मोटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी सुनील यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर करीत आहे.








