दोन तरुणींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील महादेव मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पूजा बलराम पाल यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा पाल या नेहमीप्रमाणे सकाळी घराजवळील महादेव मंदिरात पूजेसाठी गेल्या असता, मंदिरातील दानपेटीजवळ दोन अनोळखी तरुणी पैसे मोजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच दानपेटी फुटलेली असल्याचेही त्यांना दिसले. पूजा पाल यांना पाहताच दोन्ही तरुणींनी हातातील पैसे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पूजा पाल यांनी आरडाओरड करून नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यांचा आवाज ऐकून मंदिर परिसरातील गायत्री कुमावत, ओम सदावर्ते, गजानन मराठे, ज्ञानेश्वर मुलमुले यांच्यासह इतर नागरिकांनी धाव घेत दोन्ही तरुणींना पकडले.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रकाश चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पकडलेल्या दोन्ही तरुणींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघही तरुणी अल्पवयीन असल्याचे कळाले दोघी रा. समतानगर, जळगाव अशी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दोन्ही तरुणींकडून दहा रुपयांच्या ४१ नोटा, वीस रुपयांच्या ३५ नोटा आणि पन्नास रुपयांच्या सात नोटा, अशी एकूण १ हजार ४६० रुपयांची रोकड मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पूजा पाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.








