“जीएमसी”च्या बालरोग विभागाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) – एका ९ वर्षीय बालिकेला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. तसेच, अंतर्गत रक्तस्रावामुळे आणि रक्तातील साखर जास्त वाढल्याने प्रकृती अत्यवस्थ झाली होती. या बालिकेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी उपचार करून प्रकृतीत सुधारणा घडवून आणली. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
जळगावातील जैनाबाद येथिल सोनल बळीराम धांडे हि ९ वर्षीय बालिका श्वास घेण्यास त्रास होणे, भरपूर लघवी लागणे, सारखी तहान लागणे अशा कारणाने शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. तपासणीअंती तिला बाल मधुमेह असल्याचे तसेच, आतड्यांजवळ रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसून आली. तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून कृत्रिम श्वास यंत्रणेने उपचार करण्यात आले. रक्तातील साखर नियंत्रित करून प्रकृती स्थिर करण्यात आली. दोन दिवसांनी प्रकृती सुधारल्यावर तिला जनरल कक्षात दाखल करण्यात आले होते. तिला रक्ताच्या थैल्या चढविण्यात आल्या.
सदर बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. तिची प्रकृती उत्तम झाल्यानंतर तिला बालरोग विभागप्रमुख डॉ. सत्यवान मोरे यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला. बालिकेवर उपचार करण्याकामी उप अधिष्ठाता डॉ. गजानन सुरेवाड, सहयोगी प्रा. डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. जयश्री गिरी, डॉ. प्रतिभा कदम, डॉ. अनिरुद्ध कारंडे, डॉ. मयूर घुगे, डॉ. सुरसिंग पावरा यांच्यासह इंचार्ज परिचारिका संगीता शिंदे, माया सोळंकी यांनी परिश्रम घेतले.