शासनाच्या आरोग्य विभागाचे परिपत्रक
जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावचाही समावेश आहे.
राज्यभरात नव्याने स्थापन झालेल्या आरोग्य संस्थांचे बांधकाम जवळपास ७५ टक्के पूर्ण झालेले आहे. त्या संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध आता निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला आता आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मदत होणार आहे.
त्यानुसार राज्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण ९४ आरोग्य संस्थांकरिता एकूण ३६१ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ४७८ कुशल व अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यास तसेच आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड आरोग्य केंद्राचाही समावेश करण्यात आला आहे.
येथे औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पुरुष आरोग्य सहायक, स्त्री परिचर, सफाईगार, वाहनचालक हे प्रत्येकी १ तर पुरुष परिचर पदाच्या ३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.