अमळनेर तालुक्यातील धार गावातील धक्कादायक घटना; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) :- नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका पतीने आपल्या पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील धार येथे घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री राहुल भिल्ल (वय 20, रा. धार, ता. अमळनेर) ही घरकाम करून उदरनिर्वाह करते. तिचा पती राहुल रोहिदास भिल्ल याला नशेचे व्यसन असल्याचे सांगितले जाते.
दिनांक 18 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राहुल भिल्ल याने पत्नी तेजश्रीकडे नशेसाठी पैशांची मागणी केली. मात्र, तेजश्रीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला. यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
वाद वाढल्यानंतर राहुलने जवळील गुप्ती काढून तेजश्रीच्या पाठीच्या डाव्या बाजूस सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
घटनेनंतर घाबरलेल्या तेजश्रीने रात्रीच आपल्या काकांचे घर गाठून त्यांना घडलेला प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी गावातील डॉक्टरांकडे प्रथमोपचार घेतल्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याने तिला ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.









