पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडगाव आंबे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विपरीत परिस्थितीला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. २९ जून २०२४ रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील वडगाव आंबे येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष आनंदा निकम (वय वर्षे ५३, रा. वडगाव आंबे ता. पाचोरा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर कोरडवाहू शेतजमिन आहे. त्यांना पत्नी, २ मुले, १ दिव्यांग मुलीसह एकूण ३ मुली असा परिवार आहे. परिवाराला बाहेरगावी मोलमजुरी करण्यासाठी पाठवले होते व दोन मुलींच्या लग्नासाठी झालेल्या खर्चामुळे त्यांची परिस्थिती डबघाईस आली होती.
त्यांनी परिस्थितीपुढे हात टेकून शनिवारी दुपारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच त्यांना लगेचच जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रात्री मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.